बेळगाव :
बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ, टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर प्रा. अशोक आलगोडी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व विठ्ठल पोलो उपस्थित होते.
यावेळी प्रा. अशोक आलगोडी यांनी सामाजिक विषयांवर व सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता तसेच विडंबन कविता सादर केल्या. ‘कवी असल्याचे दुःख पहिल्यांदाच बोचले’ आणि बापाची वेदना व त्याग मांडणारी ‘उपेक्षित बाप’ ही कविता रसिकांनी विशेष दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मीना कुलकर्णी यांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर सुरेश प्रभू खानोलकर, रविंद्रनाथ जुवळी, विजय वाईगडे, प्रकाश कुडतरकर, अश्विनी पाटील, विजय बांदिवडेकर, विजयमाला पाटील, नारायण कोरडे, आर. जी. कुंभोजकर, उषादेवी महिंद्रकर व अशोक लोकूर यांनी मराठी व हिंदी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार शिवराज पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेन्द्र देसाई यांनी केले, पाहुण्यांची ओळख शिवराज पाटील यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन विठ्ठल पोलो यांनी केले.
