खानापूर :
17 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. 12 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
बैठकीच्या सुरुवातीस अलीकडील काळात दिवंगत झालेल्या समितीच्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर बोलताना राजाराम देसाई यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असल्याचे सांगत हुतात्मा दिनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
खानापूर तालुक्यात विभक्तपणे कार्यरत असलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीस उपस्थिती दर्शविली. त्यांनी सीमालढ्यातील पहिले हुतात्मे कै. नागाप्पा होसुरकर यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच सीमाप्रश्नी विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) बेळगाव जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती दिली.
कानडी संघटनांनी प्रशासनावर टाकलेल्या दबावामुळे शुभम शेळके यांच्यावर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या वेळी शुभम शेळके यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेला खानापूर तालुका समितीने सक्रिय सहभाग घ्यावा, असेही धनंजय पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी बोलताना सीमाप्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करूया व मध्यवर्ती समितीला विश्वासात घेऊन एकत्रितपणे दिल्लीकडे मोर्चा वळवूया, असे आवाहन केले. प्रामाणिक युवा कार्यकर्त्यांना कानडी प्रशासनाकडून होणारा त्रास सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुरलीधर पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर तीव्र टीका करत, बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात हवा की नको याबाबत राज्यातील नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी पत्रकार दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी शहरातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाविरोधात मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी सुरू केलेल्या उपोषणास तालुका समितीच्या वतीने पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
हुतात्मा दिनाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता जांबोटी, बुधवारी दुपारी 3 वाजता नंदगड आणि शुक्रवारी सकाळी 11 वाजता कणकुंबी येथे कार्यक्रम होणार असून त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत वसंत नवलकर यांच्यासह इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीनंतर खानापूर बाजारपेठेत पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
या बैठकीस प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, डी.एम. भोसले, अरुण देसाई, जे.बी. पाटील, बी.बी. पाटील, नागोजी पावले, रुक्मिणी झुंझवाडकर, शशिकांत सडेकर, अनंत पाटील, विठ्ठल गुरव, डी.एम. गुरव, आप्पासाहेब मुतकेकर, नागेश भोसले, सदानंद पाटील, म्हात्रु धबाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
