खानापूर :
माननीय उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ प्रकरणात तात्काळ कारवाई करत खानापूर तहसीलदारांची एक आठवड्यात बदली करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करत शासनाने अखेर बदली आदेश जारी केला आहे.
या निर्णयानुसार मंजुळा नाईक यांची खानापूरच्या नवीन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि महसूल विभाग यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करताच हा आदेश काढण्यात आला.
स्थानिक पातळीवर तहसील कार्यालयात काही व्यक्तींकडून चालणाऱ्या अनियमिततेबद्दल सातत्याने तक्रारी होत असताना, नवीन तहसीलदारांकडे आता लोकाभिमुख कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “तहसील कार्यालयातील दोन-चार जणांचा सुरू असलेला अकारभार आणि अभद्र वागणूक थांबवली गेली तर तालुक्याचे भले होईल. अन्यथा नवीन तहसीलदारांनाही इथे टिकणे कठीण होईल.”
खानापूर तालुक्यात सुशासन, पारदर्शकता आणि लोकहिताचे प्रशासन प्रस्थापित करण्यासाठी आता नव्या तहसीलदारांकडे जनतेच्या अपेक्षा लागल्या आहेत.
