खानापूर (प्रतिनिधी): खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सुचनेनुसार खानापूर ब्लॉक काँग्रेसचे शिष्टमंडळ आज आमगाव येथे भेट देऊन स्थलांतर विषयावर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.
सध्या जंगलभागातील गावांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला असून, त्यात आमगाव गावाचा विषय घाईगडबडीत पुढे नेला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने मंदिरात ग्रामस्थांसोबत खुली चर्चा केली.
ग्रामस्थांचे स्पष्ट मत असे आहे की, पर्यायी जागा, त्या जागेवरील शाळा, रस्ता, वीज, पाणी अशा सर्व मुलभूत सुविधा आणि १५ लाख रुपयांची भरपाई या सर्व अटी मान्य केल्याशिवाय ते स्थलांतरास तयार होणार नाहीत.
चर्चेदरम्यान खानापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, ईश्वर बोबाटे, दीपक कवठणकर, सुरेश भाऊ, पत्रकार वासुदेव चौगुले यांसह आमगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरातील बैठक संपताच आरएफओ नदाफ आणि फ़ॉरेस्टर कदम मॅडम आमगावला पोहोचले. ग्रामस्थ व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वनअधिकाऱ्यांशी सुद्धा थेट संवाद साधला. त्यावेळी ग्रामस्थांनी पुन्हा स्पष्ट सांगितले की, “फक्त १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात आम्ही आमगाव सोडणार नाही.”
आरएफओ नदाफ यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी आपली मागणी लेखी स्वरूपात दिल्यास ती पुढे पाठवली जाईल.
दरम्यान, काही दिवसांत डॉ. अंजलीताई निंबाळकर खानापूरला येणार असून, त्या वेळी आमगावचे ग्रामस्थ ताईंना भेटून आपली बाजू मांडतील. त्यानंतर ताई स्वतः संबंधित मंत्रीमहोदयांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढतील, तसेच आवश्यकतेनुसार महसूलमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतील, कारण आमगावकरांना अपेक्षित जमीन महसूल खात्याच देऊ शकते, असे शिष्टमंडळाने सांगितले.
खानापूर ब्लॉक काँग्रेसने स्पष्ट केले की आमगावकरांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.
#Belgav #BedhadakBelgav
