बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील मराठी शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली.

यावेळी मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल आणि शैक्षणिक गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करत शाळेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक दळवी यांनी उपस्थित नेते व मान्यवरांचा परिचय करून दिला.
या गौरव सोहळ्याला खादरवाडी मराठी शाळेचे शिक्षणप्रेमी व प्रसिद्ध उद्योजक रमेश पाटील, मनूर ग्रामपंचायत सदस्य साबरेकर, एसडीएमसीचे अध्यक्ष परसराम गोरल तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश माळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय उत्तम पाटील, भारत बस्टवाडकर, देवाप्पा कोलेकर, राजू डोळकर, परशुराम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
शाळेने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण खादरवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी बागेवाडी सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शाळेच्या यशामध्ये शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
