बेळगाव : विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी जाहीर केले की येत्या ८ डिसेंबरपासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी पुढील आठवड्यात बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या संमतीची पूर्तता झाल्याचे होरट्टी यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना त्यांनी उत्तर कर्नाटकातील आमदारांवर विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका केली. “दक्षिण कर्नाटकातील आमदारच विकासाबद्दल बोलतात, तर उत्तर कर्नाटकातील आमदार या विषयात गांभीर्य दाखवत नाहीत. त्यामुळे गुरुवारी विशेषतः उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.
होरट्टी यांनी पुढे सांगितले की, दोन दिवसांत सर्व आमदारांना परिपत्रक पाठवले जाईल, जेणेकरून उत्तर कर्नाटकासंबंधी कोणतीही चर्चा अधिवेशनातून वगळली जाणार नाही. “येथे अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. पैसे घेऊन मतदान करणे आणि पैसे देऊन मत मागणे चुकीचे आहे. पण या विषयावर प्रश्न विचारणारे आमदारदेखील शांत बसतात,” असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार दरवर्षी आपले हिवाळी अधिवेशन बेळगावमध्येच घेते, त्यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा मराठी जनतेच्या भावना दुखावणारा ठरत असल्याचे मराठी संघटनांचे म्हणणे आहे. मराठी माणसाला डीवचण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
यावर दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती सीमावासियांचा महा मेळावा घेते. यंदा या पार्श्वभूमीवर समिती कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
