कपिलेश्वर मंदिरातर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन

कपिलेश्वर मंदिरातर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन

बेळगाव : श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंदिराच्या सभागृहात सोमवारी (दि. २) पार पडलेल्या या शिबिरात एकूण ७५ जणांनी रक्तदान केले. सामाजिक उपक्रमाच्या यशानंतर सायंकाळी मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटनही करण्यात आले.

मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते पूजन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने मंदिरातर्फे रक्तदाते नोंदणी गट सुरू करण्यात आला असून, यासाठी १६० हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. कपिलेश्वर मंदिरातर्फे प्रथमच राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात असे उपक्रम नियमितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिबिरासाठी केएलई रुग्णालयाच्या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

यावेळी मंदिराचे सचिव अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, राजू भातकांडे, अजित जाधव, राकेश कलघटगी, प्रथमेश कावळे, जोतिबा कावळे, अविनाश खन्नुकर, अभय लगाडे, प्रताप बाचोळकर, अभि पवार, महेश सांबरेकर, रमेश देसुरकर यांच्यासह सेवेकरी ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी ७ वाजता कपिलेश्वर मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. ही वेबसाईट अमर हुंद्रे व सर्वेश चव्हाण पाटील यांनी विकसित केली असून, यावेळी अभिजीत चव्हाण यांनी वेबसाईटची सविस्तर माहिती दिली. मंदिरासंबंधी अचूक व सविस्तर माहिती भक्तांपर्यंत पोहोचावी, यासाठी हे ऑनलाइन माध्यम विकसित करण्यात आले आहे. मराठी व हिंदीसह विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध असल्यामुळे राज्याबाहेरील भाविकांनाही याचा लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर मंदिरात पालखी सोहळा व महाआरती पार पडली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − one =

error: Content is protected !!