मराठी गावांत मराठी शाळेच्या इमारतीमध्ये कन्नड शाळा सुरू करून कानडीकरणाचा घाट – कर्नाटक सरकारचा नवा डाव उघड!
कारवारनंतर आता बेळगाव जिल्ह्यातील मराठीबहुल गावांवर कर्नाटक सरकारने कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्याचा नवा डाव आखला आहे. शिक्षण खात्याने बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्याचे आदेश जारी केले असून, त्याची अमलबजावणी सुरूही झाली आहे.
बेळगाव तालुक्यातील सावगाव आणि बाची येथे मराठी शाळांच्या परिसरातच कन्नड शाळा सुरू होणार आहेत, तर खानापूर तालुक्यातील काटगाळी, बिदरभावी, राजवाळ-गवळीवाडा, हणबरवाडा आणि शिरोलीवाडा या मराठीबहुल गावांमध्येही अशाच प्रकारे कन्नड शाळांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणी केवळ एक-दोन कुटुंबांच्या मागणीचा आधार घेऊन हा निर्णय घेतल्याने मराठी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
खानापूर तालुक्यातील मराठी शाळांची दूरवस्था असताना शिक्षण खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पटसंख्या घटल्याचे कारण देऊन मराठी शाळांतील शिक्षकांची नियुक्ती रोखणे, अनुदान कमी करणे आणि शाळा स्थलांतरित करणे असे धोरण राबवले जात असताना, फक्त दोन-तीन कन्नड विद्यार्थ्यांसाठी सरकारी ममत्व दाखवले जात असल्याने मराठी जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य मराठी संस्था गावकरी याकडे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.
कॅसलरॉक येथील १७५ वर्षांपासून सुरू असलेली मराठी शाळा हा याचाच पुरावा मानला जातो. तेथे भरपूर विद्यार्थी असूनही कन्नड शाळा सुरू करण्यात आली आणि कालांतराने मराठी शाळा बंद पडली. पालकांची मानसिकता बदलण्याचा आणि पुढील पिढीचे कानडीकरण करण्याचा घाट या माध्यमातून घातला जात असल्याचा आरोप होत आहे.
सीमाभागातील मराठमोळ्या गावांत मुद्दाम कानडी शाळा सुरू करून ‘कानडीकरण’ वाढविण्याचा हा कारस्थानयुक्त डाव मराठी समाजाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न असल्याचा संताप मराठी बांधवांतून व्यक्त केला जात आहे.
#Belgav #BedhadakBelgav
