बेळगाव :
काकती पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका सराईत दुचाकी वाहन चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीची १० दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुजीफ मंजूर अहमद शेख (वय २१, रा. विष्णू गल्ली, वडगाव, बेळगाव) असे आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, काकती येथील अब्दुलरशीद इमासाब डोणकर यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी आपली सुझुकी अॅक्सेस दुचाकी (क्र. KA-22 HR-8843) चोरीस गेल्याची तक्रार काकती पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर बी. एम. यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान संशयाच्या आधारे मुजीफ शेख याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तक्रारदार डोणकर यांची चोरीस गेलेली दुचाकी तसेच इतर ९ दुचाकी वाहने जप्त केली. चौकशीत आरोपीने एकूण १० दुचाकी वाहने चोरी केल्याचे उघड झाले असून, त्यापैकी
- काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३,
- हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३,
- माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २,
- मारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १
- तसेच अन्य एका ठिकाणाहून १ दुचाकी वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
काकती पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
