बेळगाव /
इस्कॉन चळवळीतील सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदाही मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरासह मागील पार्किंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात हा महोत्सव पार पडला. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन आणि विशेष कार्यक्रमांनी जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात रंगला.
कथामहोत्सव आणि प्रवचन
गेल्या आठवड्याभरापासून इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमी कथा महोत्सव पार पडला. रोज श्रीमद् भागवतातील विविध अध्यायांवर कथाकथन होत होते. गुरुवारी त्यांनी ६०वा अध्याय उलगडत भगवंताचे दर्शन, श्रवण-कीर्तन आणि भक्तसंग यांचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी झालेल्या प्रवचनात त्यांनी श्रीकृष्णांच्या परिवाराचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. भगवान श्रीकृष्णांच्या १६,१०८ राण्या आणि लाखो संतती कशा प्रकारे त्यांच्या महालांमध्ये स्वतंत्ररीत्या नांदत होत्या याचे प्रभावी विवेचन केले.
भक्तीरसामृत स्वामी महाराज म्हणाले, “भगवंताप्रति श्रद्धा जागृत होण्यासाठी भक्तसंग अनिवार्य आहे. रागाच्या क्षणी मनुष्याने जप केला तर त्याच्या जीवनात शांती येऊ शकते.”
या प्रसंगी भक्तांनी तयार केलेल्या गाईशी संबंधित वस्तूंच्या ‘मॅचलेस गिफ्ट’ बॉक्सचे अनावरण स्वामी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यात जपमाळा, धूप, गोमूत्र, गोबर काड्या, महामंत्र व मोरपंख यांचा समावेश आहे.
भव्य कार्यक्रमांची रेलचेल
मंदिरातील गर्दी लक्षात घेऊन यावर्षी प्रथमच पार्किंग ग्राउंडवर विशेष मंडप उभारण्यात आला. सकाळी आरती, शृंगार दर्शन, भागवत प्रवचन, दिवसभर भजन-कीर्तन आणि भक्तांचा अभिषेक असा कार्यक्रम झाला. सायंकाळी देणगीदारांच्या अभिषेक सोहळ्याला मोठा उत्साह होता.
इस्कॉनचे भक्त विष्णुप्रसाद यांनी बसवलेली श्रीकृष्णांच्या जीवनावरील नाट्यलीला सादर करण्यात आली. त्यानंतर महाराजांचे जन्माष्टमी विशेष प्रवचन झाले. मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मावेळी महाआरती संपन्न झाली आणि भक्तिरसात मग्न वातावरणात महोत्सवाची सांगता झाली.
व्यासपूजा सोमवारी
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात येतो. यानुसार सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रभुपादांच्या जीवनावर गुणगान, महाराजांचे प्रवचन आणि सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.