बेळगाव, ता. ३० जुलै: आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बेळगावतर्फे यंदाची श्रीकृष्ण जन्माष्टमी अत्यंत भव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असून, त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्याचा प्रारंभ आज सकाळी पार पडला.
या मंडप उभारणीच्या मुहूर्तमेढ विधीचे पूजन व भूमिपूजन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी इस्कॉनचे प्रमुख भक्त परंपरा दास, नागेंद्र दास, नीताई निमाई दास, राम दास, ब्रजजन दास आणि अन्य भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, बेळगाव परिसरातील हजारो भाविक या उत्सवात सहभागी होणार आहेत. संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविला जाणार आहे.
सण साजरा करण्यासाठी भक्तगणांनी नियोजन आणि सेवा कार्याला सुरुवात केली असून, संपूर्ण उत्सवात हरीनाम संकीर्तन, झांकी दर्शन, प्रवचने, रासलीला आणि महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
जन्माष्टमीचा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही, तर भक्ती आणि एकात्मतेचा महापर्व आहे, असा संदेशही यावेळी स्वामी महाराजांनी दिला.