खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ४२ मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अखेर सुटला आहे. आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर इटगी येथील उच्च प्राथमिक शाळेला माध्यमिक शाळेची परवानगी देण्यात आली असून, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
मध्यंतरी इटगी गावात शाळेसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. या आंदोलनास माजी आमदार निंबाळकर यांनी पाठींबा देत, मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्या वेळीच त्यांनी शिक्षणमंत्र्यांना थेट फोन करून शाळेच्या मंजुरीसाठी मागणी केली होती.
यानंतर डॉ अंजली निंबाळकर यांनी शिक्षणमंत्री, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून २-३ वेळा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर सरकारकडून आदेश जारी करण्यात आला असून, इटगीच्या ४२ मुलींचा शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.
या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण आहे.
