हिंडलगा येथे कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा प्रेरणादायी समारोप

हिंडलगा येथे कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा प्रेरणादायी समारोप

हिंडलगा येथे श्री आर. एम. चौगुले व श्री मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर यांच्या पुरस्कृत कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा समारोप समारंभ अत्यंत प्रेरणादायी, उत्साहपूर्ण व वैचारिक वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. हा समारोप केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरला. ज्ञान, अनुभव, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा सुरेख संगम या संपूर्ण व्याख्यानमालेतून अनुभवायला मिळाला.

या उपक्रमामागे श्री आर. एम. चौगुले यांची मराठी माध्यमातील, विशेषतः ग्रामीण व दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीची तळमळ प्रकर्षाने जाणवली. इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेत मागे पडणाऱ्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळावी, ही त्यांची कळकळ या व्याख्यानमालेतून ठळकपणे दिसून आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना आधार देणे आणि “आपणही काहीतरी घडवू शकतो” हा विश्वास निर्माण करणे—ही सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून समोर आली.

समारोप प्रसंगी इंग्लिश विषयावर श्री सुनील लाड यांनी प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यान देत भाषेचे महत्त्व, आत्मविश्वासाची गरज आणि इंग्रजीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत सोप्या शैलीत समजावून सांगितला. विषयाची भीती कशी दूर करायची व चुका शिकण्याचे साधन कसे बनवायचे, याचे वास्तववादी मार्गदर्शन त्यांनी केले.

यानंतर प्रा. डॉ. मधुरा राम गुरव यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने व्याख्यानमालेचा समारोप अधिकच उंचीवर गेला. परीक्षांना सामोरे जाताना नियोजनाचे महत्त्व, अभ्यासाचे वेळापत्रक कसे आखावे आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आत्मविश्वास कसा टिकवावा—हे विचार त्यांनी मनाला भिडणाऱ्या शब्दांत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाची ठिणगी पेटवली.

यावेळी धनगर समाजातील बिरदेव डोणी यांच्या मेंढरे चारता-चारता आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख विशेष प्रेरणादायी ठरला. परिस्थिती नाही, तर मानसिकता माणसाला घडवते हा संदेश या उदाहरणातून ठामपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

या वर्षी व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना श्री आर. एम. चौगुले व मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर यांच्या वतीने शैक्षणिक गरजांचा विचार करून खास तयार केलेल्या डॉक्युमेंट फाईल्स भेट म्हणून देण्यात आल्या. ही भेट मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला दिलेला भक्कम आधार आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली दूरदृष्टीपूर्ण गुंतवणूक ठरली.

ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी श्री आर. एम. चौगुले यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रिती आर. चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर येथील संचालक डॉ. भरत चौगुले, श्री नारायण कालकुंद्री, श्री शंकर सांबरेकर, श्री युवराज काकतकर, व्याख्यानमाला पर्यवेक्षक श्री जोतिबा कालकुंद्री, सहायक श्री महेश चौगुले, श्री निरंजन अष्टेकर उपस्थित होते.

तसेच हिंडलगा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती हन्नूकर, श्री कल्मेश्वर हायस्कूलच्या श्रीमती नवगेकर, श्रीमती ओऊळकर, श्री उमेश सांगिलकरश्री चंद्रकांत राक्षे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमाचे संयत, प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन ज्येष्ठ गुरुवर्य श्री प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.

एकूणच कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमाला ही केवळ ज्ञानवाटपाची मालिका न राहता दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी, स्वप्नांना बळ देणारी आणि “आपणही पुढे जाऊ शकतो” हा विश्वास पेरणारी एक प्रेरणादायी चळवळ ठरली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 9 =

error: Content is protected !!