बेळगाव (प्रतिनिधी) / जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अनिता शंभूचे यांच्या प्रस्ताविकेने झाली. आपल्या प्रस्ताविकेत त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात बेळगावच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
अनंत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तर लक्ष्मी उसुलकर यांच्या हस्ते भारतमातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले. बाबुराव कुट्रे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मालोजीराव अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार रेणुका सामरेकर व किरण सामरेकर यांनी केला.
किरण सांबरेकर व विक्रम करेगार या युवकांनी आपल्या विचारांमध्ये तरुण पिढीसमोरील व्यसनाधीनता, आत्महत्या व बलात्कारासारख्या गंभीर समस्यांचा उल्लेख करून स्वातंत्र्याचे खरे मोल समजून घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच काश्मीरमधील भूभाग पुनःप्राप्तीसाठी त्याग व त्यासाठी नवतरुणांनी तयार राहावे, असे आवाहन केले.
मालोजीराव अष्टेकर यांनी भारताच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख करताना ब्रिटिश, पोर्तुगीज व डच सत्तेखाली भारताने भोगलेल्या वेदना सांगितल्या. भारतभूमीने अनेक शूरवीर, संत आणि वीरांगना दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर विना उंद्रे यांनीही आपले विचार मांडले.
ज्योती सुतारहीने सुत्रसंचालन केले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी परिसरातील नागरिक, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.