बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयामार्फत आयुक्त भूषण बोरसे यांनी 2024 व 2025 या कालावधीतील बेकायदेशीर कृत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार 2024 मध्ये एकूण 237 गुन्हे नोंदवले गेले असताना 2025 मध्ये ही संख्या थेट 461 वर पोहोचली आहे. वाढलेली ही आकडेवारी शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
आकडेवारीनुसार मटका/ओसी प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसून आली असून 2024 मधील 99 प्रकरणांवरून 2025 मध्ये 131 प्रकरणे नोंदली गेली आहेत. जुगार प्रकरणे 25 वरून 27 झाली आहेत. ऑनलाइन बेटिंगचे प्रत्येकी एक-एक प्रकरण दोन्ही वर्षांत नोंदले गेले आहे.
एनडीपीएस (अंमली पदार्थ) प्रकरणे सर्वाधिक चिंताजनक ठरली असून 2024 मधील 55 प्रकरणांवरून 2025 मध्ये थेट 210 प्रकरणांपर्यंत झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय बेकायदेशीर शस्त्रप्रकरणे 3 वरून 30 पर्यंत वाढली आहेत. अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा अंतर्गत प्रकरणे 4 वरून 6 झाली असून मायक्रोफायनान्स छळ प्रकरणे 1 वरून 4 इतकी वाढली आहेत.
अवैध दारू/अबकारी प्रकरणे दोन्ही वर्षांत 44 इतकीच राहिली आहेत. मानव तस्करी, स्फोटके कायदा, आवश्यक वस्तू कायदा अंतर्गत प्रकरणांमध्येही किरकोळ वाढ नोंदवली आहे. मात्र क्रिकेट बेटिंग, इतर बेटिंग, अवैध खाणी, अवैध क्लब, रिअल इस्टेट माफिया व बड्स कायदा अंतर्गत प्रकरणे शून्यावरच राहिली आहेत.
या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाने अंमली पदार्थ, मटका व शस्त्रप्रकरणांवर कडक कारवाईचे संकेत दिले असून नागरिकांनी संशयास्पद बाबी तत्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
