केतन कैलास पुरी प्रस्तुत ‘मऱ्हाटा पातशहा’ला बेळगावकरांचा हाऊसफुल प्रतिसाद

केतन कैलास पुरी प्रस्तुत ‘मऱ्हाटा पातशहा’ला बेळगावकरांचा हाऊसफुल प्रतिसाद

बेळगाव : इतिहासाला रंगमंचावर जिवंत करणाऱ्या ‘मऱ्हाटा पातशहा’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला बेळगावकरांनी उत्स्फूर्त आणि हाऊसफुल प्रतिसाद देत मराठी इतिहासाविषयीची आपली आस्था पुन्हा एकदा सिद्ध केली. येथील लोकमान्य रंगमंदिर येथे इतिहास संशोधक केतन कैलास पुरी यांनी सादर केलेला हा मराठीतला पहिलाच स्टँडअप शैलीतील इतिहास शो असल्याचे सांगण्यात आले.

केतन पुरी यांनी सुमारे दोन तासांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक अज्ञात व दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला. आजच्या पिढीला फारशी माहिती नसलेल्या घटनांचा उल्लेख करताना त्यांनी समकालीन व्यक्तींनी चित्रित केलेली महाराजांची चित्रे, तसेच विविध कागदोपत्री पुरावे प्रेक्षकांसमोर सादर केले. शिवाजी महाराजांना आदर्श का मानावे, याची शास्त्रशुद्ध कारणे आणि ऐतिहासिक संदर्भ देत त्यांनी प्रभावी मांडणी केली.

महाराजांच्या कार्याची नोंद त्यांच्या हयातीमध्येच जागतिक पातळीवर कशी घेतली गेली, याचेही पुरावे सादरीकरणादरम्यान दाखविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांनी अत्यंत गांभीर्याने ऐकला आणि नव्या दृष्टिकोनातून शिवचरित्राचा परिचय करून घेतला. अशा प्रकारचे ऐतिहासिक कार्यक्रम वारंवार आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी आयोजकांकडे व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, मधु कणबर्गी, शिवानी पाटील, संजय मोरे, डी. बी. पाटील, कपिल भोसले, श्रीनिवास तसेच बेधडक बेळगावचे संपादक पियुष हावळ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नुकतेच निधन झालेले बेळगावचे ज्येष्ठ रंगकर्मी अनंत जांगळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हा कार्यक्रम बेधडक बेळगाव, ‘आपल बेळगाव’, मोहीमफत्ते, ‘काय रे बेळगाव’, साईन मीडिया, निलेश कम्युनिकेशन आणि शशिकांत दिनानाथ कारेकर ज्वेलर्स , हॉटेल राजपथ बिकन यांच्या सहकार्याने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियुष हावळ, प्रथमेश कारेकर, अभिषेक तरळे, निखिल रायकर, सुशांत देसाई, आशुतोष कांबळे, निलेश शहापूरकर, सागर मुतकेकर, रोहन कुंडेकर, श्री काकतीकर, शिवराज चव्हाण,ओंकार आदींनी परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 9 =

error: Content is protected !!