मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात महिलेने गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. सुरुवातीला चॅटिंग आणि फोन कॉल्सद्वारे तिने त्यांच्याशी मैत्री वाढवली. नंतर तिने काही तरुणींची अश्लील छायाचित्रे पाठवून आमदारांना धमकावणे सुरू केले. या छायाचित्रांचा गैरवापर करण्याची भीती दाखवून तिने एकूण दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.
सुरुवातीला एक लाख, दोन लाख, पाच लाख अशा टप्प्याटप्प्याने मागण्या करत राहिल्यानंतर, आमदार पाटील यांनी या त्रासाला कंटाळून संबंधित महिला संपर्कातून ‘ब्लॉक’ केली. त्यानंतर तिने उलट आमदारांवरच पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली.
या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आमदार पाटील यांनी अखेर ठाण्यात पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
एका लोकप्रतिनिधीला हनी ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष्य करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील महिलेचा शोध घेण्याचे आणि वापरलेले मोबाईल नंबर, चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू आहे.
👉 ही घटना राजकीय आणि सामाजिक स्तरावर हनी ट्रॅपच्या वाढत्या प्रकरणांबाबत गंभीर इशारा देणारी ठरत आहे.
