बेळगाव : हॉकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात गोगटे कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले, तर आरपीडी कॉलेज संघ उपविजेता ठरला. मुलींच्या गटात आरपीडी कॉलेज विजेता आणि जीएसएस कॉलेज उपविजेता ठरले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक व टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. या समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून बसवेश्वर बँकेच्या माजी अध्यक्षा शैलजा जयप्रकाश भिंगे, प्रगती वाहिनीचे संपादक एम. के. हेगडे, व्हिजिलन्स अॅडिशनल कमिशनर सागर देशपांडे, जी. जी. चिटणीस स्कूलच्या प्राचार्या नवीन शेट्टीगार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बेळगाव हॉकीचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी होते.
प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी इंडियाच्या शंभर वर्षांच्या वैभवशाली इतिहासाची माहिती दिली. बेळगावने देशाला तीन ऑलिंपिकवीर दिल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, बेळगावला ‘हॉकीचे माहेरघर’ म्हणणे योग्य ठरेल. गेल्या वर्षीच बेळगावातील पाच हॉकीपटूंची मैसूर येथील डीवायएसएस स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली आहे. शहरात अॅस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज असून, ते पूर्ण झाल्यास पुन्हा एकदा बेळगाव देशाला ऑलिंपिकवीर देईल, असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुण्या शैलजा भिंगे यांनी बेळगाव हॉकीला भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. तर पत्रकार एम. के. हेगडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये रस घेऊन आपले सामर्थ्य वाढवावे, असे आवाहन केले.
अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हॉकी प्रशिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या वेळी उपाध्यक्षा पूजा जाधव, सचिव सुधाकर चाळके, अमोदराज स्पोर्ट्सचे मुकुंद पुरोहित, दत्तात्रय जाधव, प्रशिक्षक उत्तम शिंदे, मनोहर पाटील, नामदेव सावंत, विकास कलघटगी, सिद्धार्थ चाळके, गणपत गावडे, आशा होसमणी, सविता हेब्बार, संजय शिंदे, एस. एस. नरगोडी, सुरेश पोटे, श्रीकांत आजगांवकर, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, अश्विनी बस्तवाडकर, दीपक वेसणे, प्रशिक्षक अश्विनी पाटील आणि डॉ. गिरीजाशंकर माने आदी मान्यवर उपस्थित होते.
