खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील कलमेश्वर मंदिर परिसरातील सुमारे चारशे ते पाचशे वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष रविवारी झालेल्या जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे अखेर मुळासकट कोसळला.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार हा वटवृक्ष केवळ चन्नेवाडीचा नाही तर संपूर्ण नंदगड परिसराचा इतिहास जतन करून होता. मंदिरासमोरील या महाकाय वृक्षाखाली अनेक पिढ्यांची बालपणाची क्षणं, पारंब्यांवर झोक्यांचा आनंद, गुराख्यांचा विसावा, प्रवाशांचा आश्रय अशा असंख्य आठवणी जोडलेल्या होत्या. कलमेश्वर मंदिरात होणारे कार्यक्रम, महाप्रसाद आणि उत्सवही याच वटवृक्षाच्या सावलीत पार पडत.
गावातील सुवासिनींसाठी हा वटवृक्ष श्रद्धेचा प्रतीक होता. विसाव्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी यांनी याच वटवृक्षाखाली भाषण दिले होते. अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
आज या वटवृक्षाच्या नामशेष होण्याने चन्नेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील महिलांनी या जागेवर नव्याने वटवृक्ष रोपण करून मंदिराशेजारी पत्र्याचे शेड उभारण्याचा संकल्प केला असून पुढील पिढ्यांसाठी पुन्हा एकदा या ठिकाणाला जिवंत ठेवण्याचा निर्धार केला आहे.
