न्यू वंटमुरी प्रकरणात ऐतिहासिक निकाल; १२ आरोपींना ५ वर्षांची सक्तमजुरी

न्यू वंटमुरी प्रकरणात ऐतिहासिक निकाल; १२ आरोपींना ५ वर्षांची सक्तमजुरी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील न्यू वंटमुरी गावात एका महिलेवर अमानुष हल्ला करून तिचे कपडे जबरदस्तीने काढून टाकल्याच्या प्रकरणात बेळगाव न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला. या प्रकरणात १२ आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना प्रत्येकी पाच वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

११ डिसेंबर २०२३ रोजी न्यू वंटमुरी गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली होती. एका तरुणाने प्रेमसंबंधातून तरुणीसोबत पळून गेल्याच्या रागातून तरुणीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाच्या आईवर क्रूर सूड उगवला. महिलेला बेदम मारहाण करण्यात आली तसेच तिचे कपडे जबरदस्तीने काढून टाकून तिच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण १३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. प्रदीर्घ सुनावणीनंतर बेळगाव येथील १० वे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी उपलब्ध ठोस पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे १२ आरोपींना दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली शिक्षा सुनावली. यामध्ये कलम ३०७ (खून करण्याचा प्रयत्न), ३२४ व ३२६ (घातक शस्त्राने हल्ला), कलम ३५४ व ३५४ब (महिलेची प्रतिष्ठा भंग करणे व कपडे उतरवणे), तसेच कलम १४३, १४७ (बेकायदेशीर जमाव), ४५२ (घरात बेकायदेशीर प्रवेश), ५०४, ५०६ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८१ अंतर्गत कारवाईचा समावेश आहे.

दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये बसप्पा रुद्रप्पा नायका, राजू रुद्रप्पा नायका, केंपण्णा राजू नायका, पार्वती बसप्पा नायका, यल्लव्वा रुद्रप्पा नायका, लक्कप्पा राजू नायका, गंगव्वा बसप्पा वालिकरा, सदाशिव हेग्गानायक, संतोष बसप्पा नायका, शोभा राजू (राजप्पा) नायका, लक्कव्वा यल्लप्पा नायका आणि शिवप्पा रायप्पा वन्नूरी यांचा समावेश आहे.

न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कायदा हाती घेणाऱ्यांसाठी हा निकाल धोक्याचा इशारा आहे. महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − 6 =

error: Content is protected !!