बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव शहरातील हिरेबागेवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली बजाज ऑटो रिक्षा, रोख रक्कम तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त एन. व्ही. भरमणी व निरंजन राजे अरस यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्रामीण उपविभागाचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. के. होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. ९ जानेवारी २०२६ रोजी आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे योगेश राव तांडे (वय ४०), सावित्री कृष्णा वडजनवर (वय ३९) आणि जानकी बसवराज शेट्टणवर (वय ५१) अशी आहेत. सर्व आरोपी सध्या हुबळी परिसरातील रहिवासी आहेत.
आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून बजाज ऑटो रिक्षा (क्र. KA-02/KE-7065, अंदाजे किंमत ₹३.५० लाख), ₹८,००० रोख, स्क्रू ड्रायव्हर, तसेच बँक ऑफ इंडिया व्हिसा एटीएम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस पथकाच्या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.
