येळ्ळूर : आधीच कर्जबाजारी व आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी कंगाल करण्याची प्रवृत्ती सध्या उघडपणे दिसून येत आहे. पिकाऊ शिवारातून उच्चदाब वीज तारा नेण्यासाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि नुकसानभरपाईबाबत स्पष्ट माहिती न देता गेल्या वर्षापासून येळ्ळूर शिवारात मोठमोठे उंच खांब उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदारांकडून रब्बी हंगामातील उभी पिके बेदरकारपणे नष्ट केली जात आहेत.
गेल्या वर्षी रब्बी पिकांचा फडशा पाडत मोठी यंत्रसामग्री शिवारात आणून खड्डे खणण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असता “भरपाई दिली जाईल” अशी केवळ आश्वासनांची मलमपट्टी करत घाईघाईने काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र यावर्षी कोणतीही सूचना किंवा परवानगी न घेता पुन्हा रब्बी पिकांचा अक्षरशः चेंदामेंदा करत शिवारात खांब उभारण्यात आले.
यरमाळ रस्त्यालगत शहापूर शिवारात बळिराम कुंडेकर या वयस्कर शेतकऱ्याच्या शेतात मोहरी, मसूर, वाटाणा व हरभरा अशी पिके उभी असताना त्यांना दमदाटी करून ती पिके उद्ध्वस्त करत खांब उभारण्यात आले. या सर्व नुकसानीबद्दल अद्याप कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही.
संबंधित खात्याकडून नियमाप्रमाणे नुकसानभरपाई तसेच खांब उभारणीबद्दल महिन्याकाठी भाडे मिळणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना याची कोणतीही माहिती न देता सरळ लूट सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रब्बी पिकांमधून मनमानी वाहने घालून पिकांची नासधूस होताना पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
या संपूर्ण प्रकाराची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शिवारात येऊन पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
