हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही: “सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू”

हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही: “सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू”

बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठा मंदिर येथे भव्य संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार, ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार तसेच मागील शैक्षणिक वर्षात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार हेमंत ढोमे उपस्थित होते. ‘अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “मातृभाषेतून शिक्षण घेतले तर प्रगतीचे घोडे कुठेही अडत नाहीत. मराठी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचले असून ते इंग्रजीही प्रभावीपणे बोलतात. मात्र सध्या मराठी शाळांवर कठीण काळ आला असून पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढताना दिसतो. भाषा टिकली नाही तर संस्कृती टिकणार नाही. त्यामुळे मराठी भाषा आणि शाळा टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी ठाम भूमिका मांडली. “प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू. आम्ही सीमाभागातील मराठी बांधवांच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, गोपाळ देसाई, रेणू किल्लेकर आणि अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हेमंत ढोमे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आले. बेळगाव व खानापूर तालुक्यातील पाच शाळांना ‘युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

यावर्षी प्रथमच प्रतिकूल परिस्थितीत मराठी शाळा टिकवणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानज्योती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार सरकारी मराठी शाळा, जामगाव (ता. खानापूर) यांना देण्यात आला. तसेच सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार’ मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूर आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेला प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास म. ए. समिती व युवा समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी गोरल हिने केले. स्वागत श्रीकांत कदम यांनी, प्रास्ताविक प्रतीक पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ चौगुले यांनी केले.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 9 =

error: Content is protected !!