बेळगाव : श्री व सौ. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर व श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या वतीने ‘वैकुंठ धाम रथ’ या समाजोपयोगी उपक्रमाचे अनावरण सोहळा नुकताच श्री क्षेत्र दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर देवस्थान येथे पार पडला. या प्रसंगी श्री परम पूज्य हरिभाऊ महाराज रुद्र केसरी मठ सेवा समिती, महालक्ष्मी नगर, बेळगाव यांच्या शुभहस्ते रथाचे पूजन व लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हरिभाऊ महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलनाथ येथे श्री कपिलेश्वर देवाची पूजा करण्यात आली. त्यानंतर कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे श्री परम पूज्य हरिभाऊ महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, चंद्रकांत कोंडुस्कर तसेच कोंडुस्कर ट्रस्टचे सचिव श्रीधर अळवणी यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी हरिभाऊ महाराज म्हणाले, “मनुष्याच्या शरीरातून आत्मा मुक्त झाल्यानंतर शरीरात फक्त शिव उरतो. त्या शिवाला वैकुंठाला नेण्यासाठी नंदी महाराज लागतात. मृतात्म्यांना वैकुंठ धामापर्यंत पोहोचवण्यासाठी या नंदी वाहनाच्या स्वरूपात एक पुण्य कार्य सुरू झाले आहे.”
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, “बेळगाव शहरात मृत व्यक्तींना अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी वाहनांची कमतरता भासत होती. अनेकदा मृतांच्या नातेवाईकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागायची. नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन समाजहितासाठी ‘वैकुंठ धाम रथ’ सेवा सुरू करण्यात आली आहे.”
या लोकार्पण सोहळ्यास बेळगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टचे राहुल करणे, अभिजीत चव्हाण, अजित जाधव, अभय लगाडे आदींसह अनेक गणमान्य उपस्थित होते.
#Belgav #BedhadakBelgav
