बेळगाव :
‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या ‘कवितेचे पान’ या यूट्यूब चॅनलवर नुकताच कवयित्री हर्षदा सुंठणकर यांचा मुलाखत व कविता वाचनाचा विशेष एपिसोड प्रसारित झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून साहित्यप्रेमींमध्ये या एपिसोडची विशेष चर्चा होत आहे.
हर्षदा सुंठणकर यांच्या गाजलेल्या ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद अकोल्याच्या डॉ. स्वाती दामोदरे यांनी केला आहे. ‘कपडे सुखाती औरत’ या नावाने हा अनुवाद 13 जानेवारी रोजी दिल्ली येथे न्यू वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आला. या अनुवादामुळे हर्षदा सुंठणकर यांच्या कवितांना हिंदी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.
याशिवाय 9 ते 11 जानेवारी दरम्यान पणजी येथे पार पडलेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात हर्षदा सुंठणकर यांना निमंत्रित कवयित्री म्हणून विशेष आमंत्रण देण्यात आले होते. या संमेलनात त्यांनी सादर केलेल्या कवितांना उपस्थित रसिकांकडून भरभरून दाद मिळाली होती.
एकूणच ‘कवितेचे पान’ चॅनलवरील कार्यक्रम, कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद आणि जागतिक साहित्य संमेलनातील सहभाग यामुळे कवयित्री हर्षदा सुंठणकर यांच्या साहित्यिक कार्याला राष्ट्रीय पातळीवर नव्या ओळखीची झळाळी मिळत आहे.
