बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने सलग २८ व्या वर्षी भव्यदिव्य ‘हरे कृष्ण रथयात्रा महामहोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शनिवारी (दि. २४) दुपारी १ वाजता या महामहोत्सवाचा विधिवत प्रारंभ होणार आहे.
धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शामियाण्यात इस्कॉनचे अध्यक्ष प.पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज तसेच इतर ज्येष्ठ संन्याशांची प्रेरणादायी भाषणे होणार आहेत. त्यानंतर भव्य रथयात्रेस प्रारंभ होईल. ही रथयात्रा कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडी बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे ओव्हरब्रिजवरून शहापूर येथे पोहोचेल. पुढे नाथ पै सर्कलमार्गे गोवा वेस होत सायंकाळी साडेसहा वाजता इस्कॉन मंदिराच्या पाठीमागील मंडपात समारोप होणार आहे.
रथयात्रा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी पाणी, सरबत व फळांचे वाटप करण्यात येणार असून अनेक ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. अग्रभागी रांगोळ्या काढणारे पथक, सजवलेल्या बैलजोड्या व आकर्षक चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. देश-विदेशातून आलेले असंख्य भक्त या रथयात्रेत सहभागी होणार असल्याने उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार आहे.
या रथयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान श्री श्री राधा-कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान यांचे भव्य रथ. सुंदर वस्त्रे व पुष्पहारांनी सजवलेल्या रथात विराजमान होऊन भगवान बेळगाववासीयांना दर्शन देऊन आशीर्वाद प्रदान करणार आहेत. विविध कीर्तन पथके ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जयघोष करत नृत्य-कीर्तन सादर करणार आहेत.
या महोत्सवासाठी इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, मॉरिशस येथील परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज, मुंबईचे श्री दयाल चंद प्रभू, तसेच परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्यासह अनेक वरिष्ठ भक्त उपस्थित राहणार आहेत.
रथयात्रा मार्गावर व मंडप परिसरात सुमारे ५० हजारांहून अधिक प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी भगवद्गीतेच्या आधारे रचलेले ग्रंथ व इतर आध्यात्मिक साहित्याचे वितरणही करण्यात येणार आहे.
इस्कॉन मंदिराच्या मागील परिसरात आकर्षक पद्धतीने सजवलेला भव्य पंडाल उभारण्यात आला असून, शनिवार व रविवार या दोन दिवसांत भजन, कीर्तन, आरती, बालकार्यक्रम तसेच ज्येष्ठ भक्तांची प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय भगवद्गीता प्रदर्शन, स्लाइड शो, मेडिटेशन पार्क (ध्यान केंद्र), देखावे, आध्यात्मिक पुस्तकांचे व भक्तीपर वस्तूंचे स्टॉल्स, तसेच श्रीकृष्ण प्रसादाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
विशेष आकर्षण म्हणून येथे ‘गो-सेवा दालन’ उभारण्यात आले असून, गोमूत्र व शेणापासून बनवलेली विविध उत्पादने उपलब्ध असतील. दोन्ही दिवस रात्री मंडपाला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद देण्यात येणार आहे.
या भव्य धार्मिक-सांस्कृतिक उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.
