महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या महिला विभागाच्या वतीने नुकताच कावळे संकुल, बेळगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त बेळगावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सुधा भातकांडे, समितीच्या कार्यकर्त्या शिवानी पाटील आणि प्रा. मधुरा गुरव उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. श्वेता कुडूचकर यांनी केले. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता आपल्यातील सुप्त गुण ओळखून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले पाहिजे, तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही पुरुषांप्रमाणे सक्रिय सहभाग घ्यावा, हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नुकतीच मध्यप्रदेशातील मालवांचल विद्यापीठ, इंदौर येथून मेडिकल सर्जिकल नर्सिंग विषयात पी.एच.डी. पदवी संपादन करणाऱ्या डॉ. प्रा. वृषाली उर्फ सई शेखर पाटील, मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व राणी चन्नमा विद्यापीठातून “बेळगाव जिल्ह्यातील लोकसाहित्याचा अभ्यास” या विषयावर मराठी विभागातील पहिली पी.एच.डी. प्राप्त करणाऱ्या डॉ. सौ. वृषाली कदम-दड्डीकर तसेच बेळगाव जायंट्स ग्रुप सखीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुलक्षणा सदानंद शिन्नोळकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच प्राजक्ता केसरकर, गौरी केळवेकर, तनुजा कावळे, श्वेता कुडूचकर, वृषाली पाटील, वैष्णवी चौगुले आणि विना केळवेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमात बोलताना सौ. शिवानी पाटील यांनी समितीच्या कार्यात महिलांनी अधिक पुढाकार घ्यावा व मराठी भाषा आणि मराठी बाणा जपण्यासाठी सक्रिय राहावे, असे आवाहन केले. डॉ. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. डॉ. वृषाली कदम-दड्डीकर यांनी लोकसाहित्यातून जुन्या काळातील महिलांचे जीवन कसे होते याचा उलगडा करत महिलांनी महिलांमध्ये भेदभाव न करता समाजात सक्रिय योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले. प्रा. मधुरा गुरव यांनी महिलांनी कठीण प्रसंगी लोक काय म्हणतील याचा विचार न करता धैर्याने पुढे जावे आणि समाजात मुक्तपणे वावरावे, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बक्षिसे मिळविली. हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास सौ. सविता चंदगडकर, वृषाली घाडी, पल्लवी इनामदार, प्रतिभा अष्टेकर, गायत्री जाधव, राजश्री जाधव, स्नेहल कदम, कोमल हुद्दार, अंकिता देसाई, मालण शिंदे, वर्षा कदम, पुनम मोरे, लक्ष्मी केळवेकर, स्नेहल पाटील, काजल पाटील, अंकिता चव्हाण, पूजा निलजकर, नेहा मोरे, संगीता अणवेकर, नेहा बोकडे, सोनाली राम किरमटे, सोनाली शाम किरमटे आदी महिला उपस्थित होत्या. साक्षी गोरल यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. तनुजा कावळे यांनी आभार प्रदर्शन केले.
