बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ हा विशेष कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध शाळांमधील 25 उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 25 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनींना उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता मोरे यांनी सादर केलेल्या वंदे मातरम् ने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सेवाकार्याचा परिचय करून दिला, तर प्राचार्य व्ही. एन्. जोशी यांनी “गुरुवंदना” या संकल्पनेचा उलगडा केला.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन जया नायक यांनी केले तर शुभांगी मिराशी यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शहरातील सरस्वती गर्ल्स हायस्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, ज्योती सेंट्रल स्कूल, के. एल्. एस्. स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर, जी. जी. सी. इंग्रजी माध्यम स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल, बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, महिला विद्यालय, संत मीरा हायस्कूल आदी प्रमुख शाळांचा सहभाग होता.
या प्रसंगी भारत विकास परिषदेचे डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, सुहास गुर्जर, चंद्रशेखर इटी, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, ॲड. बना कौजलगी, प्रा. प्रतिभा हलप्पनवर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.