बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दरवर्षी २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही या दिनाचे औचित्य साधून प्रबोधिनीतर्फे ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन व्यवसाय व उद्योग क्षेत्रात उच्च शिखरे गाठलेल्या दांपत्यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये बेळगावमधील लिओ इंजिनियर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन चे सर्वेसर्वा जयदीप व सोनाली बिर्जे, सारस ड्रोन मेकर्सचे संस्थापक राहुल व अक्षता पाटील तसेच सीए पदवीधर ओमकार सुतार व ॲड. अक्षता सुतार यांच्याशी त्यांच्या शालेय जीवन, मराठी माध्यमातील शिक्षण व यशस्वी प्रवासाविषयी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिर, स्कूल ऑफ कल्चर येथे सायंकाळी ठिक ४.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा प्रेमी नागरिक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.
