बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांना मनोहर हुंदरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. या सुट्ट्या भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण वेळ शाळा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र येत्या शनिवारी, दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे.
युवासमितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेळगावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे आणि परत जाणे कठीण होणार आहे. तसेच विसर्जन सोहळ्यामुळे विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाचा शैक्षणिक उपयोग होणार नाही.
त्यामुळे शनिवारी शाळा पूर्ण दिवस भरविण्याऐवजी पूर्ण सुट्टी द्यावी किंवा किमान नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रापुरतीच शाळा भरवावी आणि अनंत चतुर्दशीनंतर पुढील शनिवारी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
या वेळी युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, समिती नेते शिवाजी हवळांनाचे, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर, अशोक घगवे, मोतेश बारदेसकर, सूरज जाधव, राजू पाटील, सुधीर शिरोळे, अमोल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. ✅