बेळगाव : पिस्तूल दाखवून सोनं लुटण्याचा प्रयत्न – दोघांना अटक

बेळगाव : पिस्तूल दाखवून सोनं लुटण्याचा प्रयत्न – दोघांना अटक

चिक्कोडी (बेळगाव):
अथणी शहरातील ज्वेलर्स दुकानात पिस्तूल दाखवून सोनं लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

२६ ऑगस्ट रोजी अथणी शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स या दुकानात दोन अज्ञात व्यक्तींनी दुकानदाराला पिस्तूल दाखवत सोनं लुटण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेवरून गुन्हा क्र. ३३५/२०२५ नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज शिवाय कोणतेही ठोस पुरावे नसतानाही अथणी पोलिसांनी कसून तपास करून विजय उर्फ बाबलू संजय जावीरे आणि यशवंत उर्फ ओंकार गोपीनाथ गुरव या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, एक कार आणि एक दुचाकी जप्त केली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक कार्यरत आहे.

दरम्यान, ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० ऑगस्ट रोजी हल्लाळी (ता. अथणी) येथे शेतात चालत असलेल्या गौरीव्वा बसप्पा कलशेट्टी यांचे मंगळसूत्र आणि इतर दागिने दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले होते. या प्रकरणात ऐगळी पोलिसांनी तपास करून महाराष्ट्रातील प्रदीप परसु नायक, अंकुश रमेश लोहार, एम. राजेंद्र उर्फ राजू आणि अशोक नायक यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली आणि सुमारे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

या आरोपींवर बेळगाव व महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ९ गुन्हे दाखल असल्याची माहितीही एसपी गुळेद यांनी दिली. यामध्ये ऐगळी पोलीस ठाण्यात ४, अथणी २, रायदुर्ग १, कुडची १ आणि महाराष्ट्रातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात १ प्रकरण समाविष्ट आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven − 2 =

error: Content is protected !!