बेळगाव : हॉकी खेळाडूंमध्ये एकाग्रता आणि जिद्द अत्यंत आवश्यक असून बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे. या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी सांगितले. ते मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून खेळाडूंनी सातत्याने परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या संस्थेमार्फत हॉकी खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन युवा उद्योजक कपिल भोसले यांनी दिले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, युवा उद्योजक कपिल भोसले, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविकात सुधाकर चाळके यांनी बेळगावातील ९ हॉकी खेळाडूंची हॉस्टेल, अग्निवीर आणि मराठा सेंटरमध्ये निवड झाल्याची माहिती दिली. हॉकी हा करिअर घडवण्यासाठी उत्तम खेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत सराव सत्र होणार आहे. सुमारे १५० मुला-मुलींनी या शिबिरात सहभाग नोंदवला असून त्यांना दररोज अंडी, केळी आणि दूध देण्यात येणार आहे.
या शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी आणि प्रशांत मंकाळे हे तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
उद्घाटन समारंभाला श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, दत्तात्रय जाधव, संजय शिंदे, रमाकांत कारेकर, प्रकाश बिळगोजी, सुरेश पोटे, मनोहर पाटील, शांताप्पा नरगुदी, गणपत गावडे, विकास कलघटगी, गोपाळ खांडे, अनिल राणे, शिवानंद गोडबोले, अश्वगंधा कुगजी, प्रिया जैन, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, मनिषा गोडबोले आदी उपस्थित होते.
