निपाणी (प्रतिनिधी) : मराठा सांस्कृतिक भवन, कारदगा येथे घाटमाथ्याचा मावळा संघटनेतर्फे आयोजित चौथ्या भव्य मराठी निबंध स्पर्धेला निपाणी परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात मातृभाषेबद्दल आदर, प्रेम आणि गोडी निर्माण व्हावी तसेच स्पर्धात्मक युगात योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने आणि मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा विनामूल्य आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी निपाणी भागातील विविध शाळांमधून तब्बल ४०० विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साताप्पा सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर साहित्य विकास मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी अलंकार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून निबंध स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले.
कार्यक्रमाला मान्यवर म्हणून प्रतीक कांबळे, अनिकेत खोत, अतुल अलंकार, प्रतीक डकरे, रमेश अलंकार, अमृत सावंत, उमेश कोट्रे, नितीन कुदळे सर आदी उपस्थित होते. तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आयोजित विशेष सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे विनामूल्य ही स्पर्धा घेण्यात येत असून, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची ओढ वाढवण्याचा उपक्रम सतत पुढे नेत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
