बेळगाव : सांबरा विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) निलजी ते सांबरा या रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे. सध्या दोन मार्गिका असलेल्या या रस्त्याचा चार मार्गिकांमध्ये विस्तार करण्यात येणार असून, या कामासाठी एकूण ₹७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
PWD मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, ₹१७ कोटी जमीन अधिग्रहणासाठी व ₹५५ कोटी रस्त्याच्या बांधकामासाठी खर्च केले जाणार आहेत. एकूण ४ किमी लांबीच्या या रस्त्यावर मध्यवर्ती डिव्हायडर, दोन्ही बाजूंनी फूटपाथ व स्ट्रीट लायट्स लावण्यात येणार आहेत.
सध्या राष्ट्रीय महामार्गापासून निलजीपर्यंतचा रस्ता चार मार्गिकांचा आहे. मात्र त्यानंतर सांबरा विमानतळापर्यंतचा उर्वरित रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीचा मोठा बोजा जाणवतो. हजारो वाहनांची ये-जा होत असल्याने दररोज वाहतूक कोंडी व उशीर जाणवत होता. या पार्श्वभूमीवर हा रस्ता विस्तारीत करण्याची जनतेची मागणी होती.
“जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुढील तीन आठवड्यांत पूर्ण करून, एक महिन्यात टेंडर काढण्यात येईल. आणि त्यानंतर चार ते पाच महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्यात येईल,” असे मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. या रस्त्याचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
तसेच, सांबरा विमानतळाला थेट शहराशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दीर्घकालीन प्रकल्पावरही काम सुरु असून तो पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. यामुळे विमान प्रवाशांसाठी वेळ वाचणार असून, वाहतूक अधिक सुकर होणार आहे.
दरम्यान, गांधीनगरजवळील राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक समस्या गंभीर असून, सध्या एकाच सिंगल सर्व्हिस रोडवरून हुबळी-धारवाड, बैलहोंगलहून येणाऱ्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे दुसऱ्या सर्व्हिस रोडची मागणी वाढली असून, या मागणीचा विचार सुरू असल्याचेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.