Belgav : फोर्ट रोडवरील देशपांडे पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा तब्बल महिनाभर अर्धवट अवस्थेतच ठेवण्यात आल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडून काम सुरू करण्यात आले असले तरी खड्ड्याचा कोपऱ्याचा भाग पूर्णपणे बुजविण्यात आलेला नाही. परिणामी हा भाग वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे एक महिन्यापूर्वी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. काही अंशी काम पूर्ण करण्यात आले; मात्र रस्त्याच्या कडेला असलेला कोपऱ्याचा खड्डा तसाच उघडा राहिला आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा खड्डा स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. आतापर्यंत दोन ते तीन जण या खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकाराची पाहणी महापौरांनी केली असल्याचे नागरिक सांगतात; परंतु त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष सुरूच असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
फोर्ट रोड हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी अर्धवट कामामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन खड्डा पूर्णपणे बुजवून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
#Belgav #BedhadakBelgav
