खानापूर – खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांच्या उपोषणाला डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, यासंदर्भातील त्यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉ. निंबाळकर यांच्या सूचनेनुसार खानापूर ब्लॉक अध्यक्ष श्री. ईश्वर (घाडी) साहेब, महादेव कोळी, सुरेश भाऊ, गुड्डू टेकडी, इसाक खान पठाण तसेच नगरसेवक सुरेश दंडगल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, ब्लॉक अध्यक्ष घाडी साहेब यांनी तहसीलदार व एडीएलआर यांना फेरमोजणीसंदर्भात निवेदन दिले असून, फेरमोजणी उद्या सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. अंजली निंबाळकर यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये खानापूर तालुक्यातील सर्व पक्षांनी दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांच्या उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ब्लॉक अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत रास्त असल्याचे नमूद करताना, रस्त्यांच्या कामासाठी वापरला जाणारा निधी हा जनतेचा व करदात्यांचा असल्याने तो योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ काही भाजप नेत्यांच्या दुकानांच्या संरक्षणासाठी रस्ता वळवणे किंवा अरुंद करणे चुकीचे असल्याची त्यांनी कडवट शब्दांत टीका केली.
रस्ते हे नगरपालिका हद्दीत येतात व ते सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी असतात, दुकानदारांच्या वैयक्तिक सोयीसाठी नव्हेत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. भाजपचे माजी ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारीसुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचे नमूद करत, हे त्यांच्या स्वतःच्या आमदार व कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या नाराजीचे स्पष्ट द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एकाच रस्त्यासाठी ही जवळजवळ चौथी वेळ आंदोलन, निषेध व वाद निर्माण होत असतानाही आमदार मौन का बाळगत आहेत, असा सवाल उपस्थित करत, उच्च न्यायालयाकडून काही ठिकाणी स्थगिती आदेश असतानाही कंत्राटदारावर कारवाई का होत नाही, असा सवाल डॉ. निंबाळकर यांनी केला आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दुकानदार, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, गावकरी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी तसेच महिला या रस्त्याच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त असल्याचे नमूद करत, खानापूरचे भाजप आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांनी आता तरी जागे व्हावे व जनतेच्या बाजूने उभे राहावे, असे थेट आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या पोस्टच्या शेवटी डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार यांनी दिनकर मरगाळे व विवेक गिरी या “खानापूरच्या दोन योद्ध्यांच्या” उपोषणाला आपला पूर्ण व ठाम पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
