चिक्कोडी │ तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी अल्पसंख्याक शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत ५० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील आणि चिक्कोडीचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश हरीश पाटील यांनी शाळेला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची विचारपूस करून अन्नपुरवठा व स्वयंपाकघराची तपासणी केली.
या प्रकरणात अन्नाच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
