फटाक्याच्या स्फोटात युवकाचे दोन्ही डोळे निकामी; मदतीचे आवाहन

फटाक्याच्या स्फोटात युवकाचे दोन्ही डोळे निकामी; मदतीचे आवाहन

बेळगाव : होळी उत्सवाच्या तयारीदरम्यान फटाक्याच्या स्फोटात एका युवकाचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या उपचारासाठी व पुढील आयुष्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

जखमी युवकाचे नाव शिवा लोहार (वय ३२) असे असून तो नवी गल्ली येथील रहिवासी आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो भारत नगर येथील लंबोदर श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या सर्व सण-उत्सवांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत होता. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तो अत्यंत श्रद्धावान व मनमिळावू कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी उत्सव २०२६ साठी होळी रचनेची तयारी सुरू होती. त्याआधी भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामना पाहिल्यानंतर भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना अल्प प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यावेळी शिवा लोहार सुतळी बॉम्ब लावत असताना अचानक स्फोट झाला आणि या अपघातात त्याचे दोन्ही डोळे गंभीर जखमी झाले.

त्याला तातडीने केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय, बेळगाव येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचारांसाठी सुमारे ३० ते ४० हजार रुपये खर्च झाला असून तो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मदतीतून उचलला आहे.

शिवा लोहारच्या कुटुंबात त्याची वृद्ध आई सोडली तर दुसरा कोणीही कमावणारा सदस्य नाही. त्यांचे घरही केवळ १०x१५ चे कौलारू असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

मंडळाच्या वतीने त्याच्या पुढील उपचारासाठी तसेच डोळा प्रत्यारोपण (Eye Donation / Transplant) मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात मदतीचे आवाहन करण्यात येणार असून नागरिकांनी सढळ हाताने सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + 7 =

error: Content is protected !!