सांबरा (बेळगाव) : सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जोई यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शाळेच्या सभागृहात सकाळी पार पडलेल्या निरोप समारंभात सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.
सायंकाळी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राजशेखर करडीगुद्दी, लक्ष्मण कोळ्यापगोळ, संतोष देसाई आणि पत्रकार वसुधा सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसुधा सांबरेकर यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश द्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी म्हणून प्रणय जत्राटी आणि श्रेया जाधव यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, भारतीय संस्कृती तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य व नाटिका सादर करून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
या प्रसंगी काशिनाथ धर्मोजी, रुपलक्ष्मी जत्राटी, एस. वाय. कुरबर, प्रकाश पाटील, महेश जत्राटी, यल्लाप्पा हरजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ए. ए. पाटील, ए. बी. पागाद, टी. व्ही. पाटील आणि ए. सी. देवकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. आर. बी. लोहार आणि आर. बी. मगदूम यांनी सूत्रसंचालन केले, तर व्ही. ए. कंग्राळकर यांनी आभार मानले.
