वैद्यकीय शिबीरासह गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कुस्तीपटूंचा सत्कार
कंग्राळी खुर्द – माजी आमदार कै. बी. आय. पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनी त्यांच्या परिवाराच्या वतीने विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने गावात मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच गावातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गावच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत अध्यक्षा दोडव्वा माळगी, माजी अध्यक्ष यल्लप्पा पाटील, सदस्य राकेश पाटील व विनायक कम्मार यांच्या हस्ते फोटोपूजनाने झाली. त्यानंतर माजी सदस्य बाळाराम पाटील आणि माजी अध्यक्ष भाऊ पाटील यांनी कै. पाटील यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. श्रीफळ वाढविण्याचा मान जवान सोमनाथ पाटील यांना मिळाला.
यानंतर महात्मा फुले मंडळाच्या वतीने ॲड. एम. जी. पाटील, उपाध्यक्ष कल्लप्पा पाटील व पीडीओ गोपाळ नाईक यांनी आदरांजली अर्पण केली. तसेच तालीम मंडळाच्या वतीने प्रविण पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मनोहर पाटील, मराठा साम्राज्य स्पोर्ट्सच्या वतीने पशुवैद्य डॉ. सुहास पाटील आणि आंबेडकर गल्लीच्या वतीने अरुण कोलकार यांनीही सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात ॲड. सतीश बांदिवडेकर, ॲड. एम. जी. पाटील, प्रल्हाद मुतगेकर आणि पिंटू पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करत कै. बी. आय. पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी गावातील 20 पेक्षा अधिक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले.
तसेच अलीकडेच दसरा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या कुस्तीपटूंमध्ये पै. कामेश पाटील, पै. प्रेम जाधव आणि महिला कुस्तीपटू भक्ती पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय शिबिरात जवळपास दीडशे नागरिकांनी मधुमेह व रक्तदाब तपासणीचा लाभ घेतला.
या अभिवादन कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ बेन्नाळकर, यशोधन तुळसकर, एसडीएमसी अध्यक्षा मिनाक्षी मुतगेकर, बाळ बसरीकट्टी, लक्ष्मण जाधव, पै. कल्लप्पा पाटील, पै. अमर निलजकर, पै. मनोहर पाटील, पै. किसन पाटील, पै. रोहित पाटील, मयूर पाटील, शाहीर बाबूराव पाटील, नारायण बाळेकुंद्री, पै. शुभम, भाऊ बेन्नाळकर, सागर पाटील, एम. एन. पाटील, प्रल्हाद पाटील, बाबुराव पाटील, बाळू पुजारी, जे. आर. पाटील सर, आप्पाजी हनुरकर, सुनील बेनाळकर तसेच कै. आ. पाटील परिवाराचे सर्व सदस्य आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन किसन पाटील यांनी केले.
