हळदी-कुंकूच्या निमित्ताने मण्णूरमध्ये महिला शक्तीचा जागर. “महिला सक्षम झाली की समाजाचं भवितव्य उजळतं” – अ‍ॅड. तृप्ती सडेकर पाटील

हळदी-कुंकूच्या निमित्ताने मण्णूरमध्ये महिला शक्तीचा जागर.       “महिला सक्षम झाली की समाजाचं भवितव्य उजळतं” – अ‍ॅड. तृप्ती सडेकर पाटील

मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर व आर. एम. चौगुले यांच्या संयुक्त सौजन्याने रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी अनन्या फार्महाऊस, मण्णूर येथे पारंपरिक हळदी-कुंकू समारंभासह आयोजित करण्यात आलेला सौभाग्य व सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात व अभूतपूर्व उपस्थितीत पार पडला. मण्णूर व परिसरातील चारशे ते साडेचारशेहून अधिक महिलांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

सौभाग्य, स्नेह, संस्कार आणि सामाजिक ऐक्य यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या कार्यक्रमाने मण्णूरच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. हळदी-कुंकूसारख्या पारंपरिक समारंभाला महिला सक्षमीकरण, सन्मान आणि सामाजिक भानाची जोड मिळाल्याने हा सोहळा केवळ परंपरेपुरता न राहता विचारप्रवर्तक ठरला.

या प्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी आयुष्य वेचणारे पर्यावरणवादी डॉ. शिवाजीदादा कागणीकर, न्याय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या धारवाड उच्च न्यायालयातील अ‍ॅड. तृप्ती सडेकर पाटील, राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये सुळगा गावाचे नाव उज्ज्वल करणारी बीसीसीआय अंडर-१५ क्रिकेटपटू श्रेया पोटे (सुळगा) तसेच ब्लॅक बेल्ट कराटेपटू प्रतिक्षा जोतिबा चौगुले (मण्णूर) यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमातील सर्वात भावस्पर्शी क्षण ठरला तो मण्णूरच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरणाऱ्या, मण्णूर येथील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. शेफाली डी. चौगुले यांच्या गौरवाचा. ग्रामीण भागात आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी दिलेले निःस्वार्थ योगदान, रुग्णांप्रती असलेली आपुलकी आणि सेवाभाव याबद्दल उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.

यावेळी डॉ. शेफाली डी. चौगुले यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेले त्यांचे वडील डी. एम. चौगुले यांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण परिस्थितीतही मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, डॉक्टर व्हावे आणि समाजसेवा करावी हा दूरदृष्टीपूर्ण विचार उराशी बाळगून त्यांनी दिलेले पाठबळ आज अनेक पालकांसाठी आदर्श ठरत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. “एका वडिलांच्या विश्वासातून एक डॉक्टर घडली, आणि त्या डॉक्टरमधून अख्खं गाव प्रेरित झालं,” अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.

याच समारंभात सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि महिला शक्तीचे प्रतीक ठरलेल्या प्रा. छाया अरविंद मोरे-पाटील (वडगाव सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय, वडगाव)पुनम अमोल पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अ‍ॅड. तृप्ती सडेकर पाटील यांनी आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून उपस्थित महिलांना प्रेरित केले. त्या म्हणाल्या, “महिला सक्षम झाली की केवळ कुटुंब नव्हे, तर संपूर्ण समाजाचं भवितव्य उजळतं. स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला, तर कोणतीही अडचण तिच्या प्रगतीला रोखू शकत नाही.” महिलांनी शिक्षण, आत्मविश्वास, कायदेविषयक जागरूकता आणि आर्थिक स्वावलंबन या चार आधारस्तंभांवर उभं राहावं, असा सशक्त संदेश त्यांनी दिला.

पर्यावरण संवर्धनाचे प्रणेते डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी महिलांचे स्वावलंबन, सेंद्रीय शेती आणि निसर्गसंरक्षण यांचे महत्त्व विशद करत “निसर्ग जपणं म्हणजे भविष्य जपणं; आणि या लढ्याची खरी सूत्रधार स्त्रीच आहे,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर या संस्थेच्या सामाजिक व आर्थिक वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील विविध योजनांची माहिती दिली तसेच संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्या भागभांडवलदार व शेअरहोल्डर्सचे मनःपूर्वक आभार मानले.

या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे कुद्रेमणी येथील नुकत्याच भारतीय सैन्यात भरती झालेल्या युवा युवतींचा सत्कार, ज्यामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक प्रकाश बेळगुंदकर यांनी संयत व रसपूर्ण शैलीत केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भरत चौगुले यांनी केले.
हळदी-कुंकूच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा सन्मान, सौहार्द, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा जागर ठरला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

error: Content is protected !!