रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षणासाठी ‘शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उद्घाटन

रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षणासाठी ‘शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उद्घाटन

बेळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्ससारख्या क्षेत्राचे शिक्षण मिळावे या उद्देशाने शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन या संस्थेचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. या केंद्राचे फ्रेंचाईझी मालक अजीज बरफवाला असून उद्घाटन युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोट्सचे कामकाज आणि त्यामागील तंत्रज्ञान पाहून उपस्थितांनी उत्सुकता व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, ड्रोन प्रोग्रामिंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), डिझाईन थिंकिंग आणि 3D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना फ्रेंचाईझी मालक अजीज बरफवाला यांनी बेळगावमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बेळगावमधील विविध शाळांमध्ये हे शिक्षण मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात मृणाल हेब्बाळकर यांनीही विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जोडले जाणे काळाची गरज असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या नव्या केंद्रामुळे बेळगावातील विद्यार्थ्यांना लहान वयातच आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 2 =

error: Content is protected !!