बेळगाव – मंगळवारी (दि. २२ जुलै) सायंकाळी बेळगाव शहरातील गणपत गल्ली परिसरात महानगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रतेने राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी नागरिक आणि पोलिस प्रशासनामध्ये वादावादीचे प्रसंग घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.प्रशासनाच्या मते, अनेक दुकानदारांनी मूळ दुकान हद्दीतून बाहेर गटारांवर फलक लावून अतिक्रमण केले होते. अशा अतिक्रमणांवर कारवाई करत फलक, बोर्ड आणि उभारलेले साहित्य हटवण्यात आले. विशेष म्हणजे, रस्त्यावर फळभाजी विकणाऱ्यांनाही चेतावणी देण्यात आली असून, वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.या कारवाईवर काही नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्या मते, मंगळवारी अनेक दुकाने बंद असतात, त्यामुळे त्या दिवशी मोहीम राबवणे चुकीचे होते. यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.तथापि, पोलिस प्रशासनाने यावर उत्तर देताना सांगितले की, दुकानदारांना आणि व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही कोणीही अतिक्रमण हटवले नाही, म्हणून ही मोहीम राबवावी लागली.प्रशासनाने स्पष्ट केले की, पुढील काळातही व्यापक स्वरूपात अशा मोहिमा राबवल्या जातील. तसेच अतिक्रमण न हटवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचारी, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिस अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील नागरिक, व्यापारी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून प्रशासनाच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणपत गल्ली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रतेने राबवली; नागरिक आणि पोलिसांत वादावादी
