बेळगाव, ३१ जुलै – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांना सर्व आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ शुक्रवार दिनांक १ ऑगस्टपासून पोलीस आयुक्तालयात सुरू होणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
गेल्या आठवड्यात पोलीस आयुक्तांनी विविध पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या चर्चेतून निर्माण झालेल्या मागणीनुसार, मंडप उभारणे, वीज जोडणी, क्षेपणाक लावणे यासाठी लागणाऱ्या विविध शासकीय खात्यांच्या परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी ही ‘एक खिडकी’ सुविधा सुरू करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लागणाऱ्या परवानग्या – महानगरपालिका, hescom, अग्निशामक दल, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभाग – या सर्वांची मंजुरी आता पोलीस आयुक्त कार्यालयातून मिळणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने अर्ज पोलीस आयुक्तालयात सादर करावा लागेल.
परवानगी प्रक्रियेस समन्वय साधण्यासाठी सीसीआरबीचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी 9845110983 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. एक खिडकी केंद्र रोज दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत कार्यरत राहणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी साऊंड सिस्टिमला परवानगी द्यायची की नाही यावर पोलीस यंत्रणा विचार करत असून, गुरुवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बर्मनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस परेड मैदानात साऊंड सिस्टिमच्या ध्वनी प्रदूषणाची यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली.
ही एकात्मिक व्यवस्था मंडळांच्या वेळ आणि श्रमांची बचत करणार असून, गणेशोत्सव शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यास मदत करणार आहे.