बेळगाव : वरेरकर नाट्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील अभिनय कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने दिनांक 27 मार्चपासून आठ दिवसांचे नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते नववीतील मुला-मुलींसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून सकाळी 9 ते 1 या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या शिबिरासाठी प्रसिद्ध नाट्यकर्मी श्रीमती नीता कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना रंगमंचावरील हालचाली, संवाद सादरीकरण, आवाजाची फेक कशी करायची याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून प्रभावी संवाद कसा साधायचा याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुकांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन वरेरकर नाट्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी वरेरकर नाट्य संघ येथे सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी 9742859656 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
