ठेकेदाराच्या गलथानपणामुळे ‘ब्रेकफेल मैना’चा विजेच्या धक्याने मृत्यू
रयत गल्लीतील शेतकऱ्याची अडीच लाखांची म्हैस दगावली; ठेकेदाराची उडवाउडवीची उत्तरं
बेळगाव – रयत गल्लीतील युवा शेतकरी तेजस मरवे यांच्या अडीच लाख रुपये किमतीच्या पंढरपूरी जातीच्या म्हशीचा विजेच्या प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी भारतनगर येथील युनियन बँक समोरील जागेत म्हशी चरून घरी येत असताना रस्त्याशेजारील लाईट खांबाजवळील उघड्या वायरींमधून वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहामुळे तीन म्हशींना विजेचे झटके बसले. त्यापैकी दोन म्हशींना शेतकरी आणि परिसरातील लोकांनी अथक प्रयत्न करून वाचवले, मात्र ‘मैना’ नावाची रोज 14 लिटर दूध देणारी म्हैस जागीच मृत पावली.
या घटनेमुळे संपूर्ण रयत गल्लीसह वडगाव आणि परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ‘ब्रेकफेल मैना’ म्हणून सर्वांची लाडकी असलेली ही म्हैस अचानक गेल्याने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस, पशूवैद्यकीय अधिकारी आणि वीज खात्याने पंचनामा करून अहवाल तयार केला.
रविवारी सकाळी ठिकाणी ठेकेदाराचे कर्मचारी पाहणीसाठी आले असता शेतकरी आणि वाहनचालकांनी त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले. खुल्या वायरींना झाकण न लावणे, पावसाचे पाणी साचलेल्या ठिकाणी प्रवाहित वीज राहणे यामुळेच अपघात झाल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते.
या निष्काळजी कारभाराबाबत शेतकरी वर्गाने संताप व्यक्त करत तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी केली असून न्यायालयात दावाही दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
#Belgav #BedhadakBelgav
