रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेजमिश्रित पाणी; उग्र वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेजमिश्रित पाणी; उग्र वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बेळगाव : शहर स्मार्ट सिटीच्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. वडगाव येथील रयत गल्लीतील ऐतिहासिक विहिरीत ड्रेनेजमिश्रित पाणी येऊ लागल्याने परिसरातील नागरिक आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ही विहीर १९३६ साली येळ्ळूर तालुका लोकल बोर्डच्या माध्यमातून त्या काळातील जेष्ठ शेतकऱ्यांनी बांधली होती. अनेक वर्षे परिसरातील नागरिकांसाठी ही विहीर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली होती. बेळगाव शहरातील अनेक विहिरी पूर्वी बुजवण्यात आल्या, त्यावेळी ही विहीरही रस्त्यात येते म्हणून बुजवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध करत भविष्यात पाण्याची गरज भासेल, असे भाकीत करत विहीर जपून ठेवली.

काळानुसार शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यानंतर महानगरपालिकेने अनेक बुजवलेल्या विहिरी पुन्हा उघडून त्यावर शुद्ध पाणी प्रकल्प बसवण्यास सुरुवात केली. त्याच पार्श्वभूमीवर रयत गल्लीतील या विहिरीलाही महत्त्व प्राप्त झाले. मागील नगरसेवक तसेच त्यावेळचे महापौर संभाजी पाटील यांनी विहिरीच्या बाजूला पाणी शुद्धीकरण टाकी बसवून विहिरीचे पाणी शुद्ध करून रयत गल्ली व परिसरात पुरवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे ही विहीर नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली.

मात्र सध्या परिस्थिती गंभीर झाली असून विहिरीत तसेच परिसरातील बोअरवेलमध्ये ड्रेनेजमिश्रित पाणी येऊ लागले आहे. या पाण्यातून उग्र दुर्गंधी येत असल्याने जनावरेसुद्धा ते पाणी पिण्यास टाळत आहेत. याबाबत नागरिकांनी संबंधित एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी विहिरीतील पाणी काढून टाकत त्यात ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोनदा प्रयत्न करूनही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही.

स्थानिकांच्या मते परिसरातील ड्रेनेज लाईन कुठेतरी लिकेज झाल्यामुळे त्यातील सांडपाणी विहिरीत व बोअरवेलमध्ये मिसळत आहे. याआधीही रयत गल्लीतील हातपंप बोअरमध्ये असेच मिश्रित पाणी आल्यामुळे ती बोअर सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर परिसरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेने तातडीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ड्रेनेजमिश्रित पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा रयत गल्लीतील शेतकरी, जनावरे आणि नागरिकांसह महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 8 =

error: Content is protected !!