खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी भागातील हबनहट्टी येथे माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या वाल्मिकी मंदिराचे उद्घाटन प्रभू श्रीरामाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकू नाईक, स्वागताध्यक्ष नागोजी पाटील होते. सूत्रसंचालकांनी माहिती देताना सांगितले की जांबोटी परिसरातील हे एकमेव वाल्मिकी मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी आमदार असताना डॉ. अंजलीताईंनी १२ लाखांचा निधी मंजूर केला होता, तसेच सीसी रोडसाठी ५ लाख आणि ४ लाखांचा अतिरिक्त निधीही ताईंनी दिला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी लक्ष्मण झांजरे, दीपक कवठनकर, प्रदीप कवठनकर, सुरेश कांबळे, लक्ष्मी घाडी, पंचमंडळी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला.
प्रसंगी बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, “ग्रामस्थांनी तीस-चाळीस वर्षांपूर्वी या मंदिराच्या उभारणीचा संकल्प केला होता. तो आज पूर्ण झाल्याचे समाधान मला वाटते. आमदारकीच्या काळात मी तालुक्यातील अनेक मंदिरांना निधी दिला. हबनहट्टी वाल्मिकी मंदिरासाठी, श्रीकृष्ण मंदिरासाठी तसेच मारुती मंदिरासाठीही अनुक्रमे निधी मंजूर केला. विशेषतः मारुती मंदिरासाठी २५ लाखांचा निधी मी उपलब्ध करून दिला.”
पुढे बोलताना ताईंनी भावनिक शब्दांत सांगितले, “आज वाल्मिकी जयंतीच्या या पवित्र दिवशी प्रभू रामाच्या साक्षीने मी सांगू इच्छिते की आमदार साहेब जेव्हा जेव्हा विकासकामांसाठी या ताईंची गरज भासेल, तेव्हा मी नेहमी तुमच्या सोबत असेन. याबाबत कोणीही शंका बाळगू नये.”
तालुक्यातील जनतेने नेहमी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ताईंनी म्हटले, “या तालुक्यातील जनतेमुळेच माझे नाव पक्ष संघटनेत देशभर पोहोचले आहे. गोवा, दिव-दमन, उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये मी पक्षकार्य करत असते, आणि त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या तालुक्याच्या जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो. त्यामुळे मी या जनतेची सदैव ऋणी राहीन.”
या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून वातावरण धार्मिकतेने आणि विकासाच्या निर्धाराने भारलेले होते.
