बेळगाव: कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने श्री वेताळ देवस्थान व श्री बसवांना देवस्थान येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अदिती पवार, प्रीती पाटील आणि मेघना पाटील यांनी मंदिरासमोर आकर्षक रांगोळी रेखाटून झाली.
कुमारी ज्योती सुतार हिने दीपोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करत “दिव्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा” अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर पंचमंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. सौ. नीलम बडवाना व सौ. वंदना देसाई यांनी पूजा विधी केले.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्त्री-पुरुषांनी देवस्थान परिसरात आरत्या म्हटल्या. महिलांनी दिव्यांची सुंदर आरास करून संपूर्ण परिसर उजळून टाकला.
दिवाळीच्या निमित्ताने घरासमोर काढण्यात आलेल्या रांगोळ्यांचे परीक्षण करून उत्कृष्ट रांगोळीसाठी अनेक महिलांना पंचमंडळींच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण अध्यक्ष चंद्रप्रभा सांबरेकर, अंजनाताई शंभूचे आणि पंचमंडळींच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटप करण्यात आले. अदिती पवार हिने आभारप्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुतार हिने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता शंभूचे, वनिता मुतकेकर, रेणुका कोकितकर, लक्ष्मी उसूलकर, सुनिता शंभूचे आणि विजया संभाजीचे यांनी विशेष परिश्रम घेतले.
