बेळगाव : हिंदवाडी येथील विख्यात श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या अकॅडमी ऑफ कॉम्परेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी मंदिराच्या दिव्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भक्तीरसपूर्ण ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. १०० वर्षांच्या परंपरेचा गौरव साजरा करताना संगीताच्या माधुर्यातून अध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी उपस्थितांना लाभली.
या प्रसंगी गायक विनायक मोरे, ऋषिकेश हेर्लेकर, योगेश रामदास तसेच गायिका सुलक्षणा देसाई व अक्षता मोरे यांनी विविधढंगी भक्तीगीते, अभंग, भजन आणि दासपदे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाला हार्मोनियमवर मुकुंद गोरे, तबल्यावर अंगद देसाई आणि पखवाजवर ज्ञानेश्वर पाटील यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. तब्बल दोन तास रंगलेल्या या मैफलीत सभागृहात भक्तीरस ओसंडून वाहत होता आणि रसिक श्रोते भारावून गेले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आरती आपटे यांनी कलाकारांची ओळख करून दिली. सचिव ॲड. एम्. बी. जिरली यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. विश्वस्त सुब्रमण्य भट यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मान्यवरांसह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
#Belgav #BedhadakBelgav
